अहमदाबाद(प्रतिनिधी )दि. २६ नोव्हेंबर
शहरातील जय भीम बुद्ध विहार, रायपूर येथे २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकृत झाल्याच्या ऐतिहासिक दिनाचे स्मरण म्हणून ‘संविधान गौरव दिवस’ विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरभरातील मान्यवर, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली, ज्यामुळे लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचे दर्शन झाले.
या भव्य कार्यक्रमाला झोन-६ चे डीसीपी श्री. भागीरथ टी. गढवी आणि कागदापीठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. श्रीकांत गोहिल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी संविधानाच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. देशाची लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी तसेच संविधानातील तत्त्वांची जपणूक करण्यासाठी नागरिकांनी सदैव जागृत आणि सक्रिय राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानातील मूलभूत तत्त्वांचा गौरव करण्यात आला. नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांविषयी जागरूकता वाढवून सामाजिक बांधिलकी मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश यशस्वीरित्या साध्य झाला.
सुमारे चार दशकांचा गौरवशाली इतिहास असलेल्या जय भीम बुद्ध विहाराने खान्देशी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीत मोलाचा वाटा उचलला आहे. रायपूर परिसरातून सुरू झालेला हा प्रवास अमराईवाडी, सुखरामनगर आणि इतर भागांत स्थलांतरित झाला असला तरी, विहाराशी असलेली समाजाची नाळ आजही कायम आहे.
२००९ मध्ये परिसर पाडल्याने विहार जमीनदोस्त झाले होते, परंतु समाजातील तरुणांनी रायपूर जय भीम मित्र मंडळाच्या पुढाकाराने ते पुन्हा नव्या उत्साहाने उभारले. हे नवे विहार आज पुन्हा एकदा समाजाला एकत्र आणणारे, संस्कृती जपण्याचे आणि सामाजिक एकता वाढवण्याचे केंद्र बनले आहे.
विहाराचे अध्यक्ष श्री. रवी सपकळे हे बाबासाहेबांप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या भावनेतून विहाराची कार्ये प्रभावीपणे चालवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विहारात विविध सामाजिक आणि संस्कारपर उपक्रम सातत्याने राबविले जातात.
या कार्यक्रमाचे संयुक्त आयोजन जय भीम बुद्ध विहार आणि जय भीम मित्र मंडळ, रायपूर (अहमदाबाद) यांनी केले होते, ज्यात बहुजन चॅरिटेबल ट्रस्टने सहकार्य केले. नागरिकांच्या उत्साही सहभागाने संविधान गौरव दिनाची ही भव्य सांगता अत्यंत यशस्वीरित्या पार पडली.
खान्देश समाचार गुजरात न्यूज नेटवर्क
