अमळनेर (प्रतिनिधी): शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ताडेपुरा भीम नगर येथील अत्यंत जुनी आणि पारंपरिक समजली जाणारी भीम जयंती यंदाही मोठ्या थाटामाटात साजरी झाली. पंचशील युवक मंडळाच्या वतीने आयोजित या मिरवणुकीत भीम सैनिकांचा मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला.
या मिरवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भारतीय संविधान आणि संसद भवनाची आकर्षक प्रतिकृती असलेला रथ होता. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेल्या या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डीजेच्या तालावर भीमगीतांवर नाचत अबालवृद्धांनी महामानवाचा जयघोष केला. या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मिरवणुकीची सुरुवात संध्याकाळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुयोग नाना धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आमदार अनिल दादा पाटील यांनी मिरवणुकीला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरला.
तसेच नगराध्यक्ष डॉ.परीक्षित बाविस्कर, नगरसेवक नावेद शेख, श्रीराम चौधरी, कांबळे, सामाजिक कार्यकर्ते पंकज भोई, सलीम टोपी, विजय पाटील, गौतम अनिल पाटील, पत्रकार जितू ठाकूर, पत्रकार चेतन राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर मिरवणुकीचे यशस्वी आयोजन पंचशील युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केले होते. अत्यंत शांततेत आणि उत्साही वातावरणात हा भीम जयंती महोत्सव पार पडला.
