अमळनेर: शहराच्या स्वच्छतेचा भार खांद्यावर वाहणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगार आणि ठेकेदार यांच्यातील वाद आता ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वेतन, पीएफ आणि सोयी-सुविधांच्या प्रश्नावर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पुढाकार घेत संयुक्त बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत समोर आलेली तथ्ये ही कामगारांच्या शोषणाची भयावहता अधोरेखित करणारी आहेत.
घनकचरा कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या मेहुल बिऱ्हाडे यांनी बैठकीत पुराव्यासह मांडलेली बाजू धक्कादायक आहे. आजच्या डिजिटल इंडियाच्या काळातही कामगारांचे वेतन बँक खात्यावर न देता साध्या वहीवर पेन्सिलीने लिहून दिले जाते आणि नंतर ते खोडून टाकले जाते, हा आरोप केवळ गंभीर नसून प्रशासकीय व्यवस्थेचे अपयश दर्शविणारा आहे.
हक्काचा भविष्य निर्वाह निधी (PF) दुसऱ्याच्याच नावाने जमा होणे किंवा तो मुळीच जमा न होणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरू शकतो.
महागाईच्या काळात कायद्याने ठरवून दिलेले किमान वेतनही मिळत नसल्याने कामगारांचे जगणे मुश्किल झाले आहे.
कचरा हाताळताना आवश्यक असणारे आरोग्य किट (हातमोजे, मास्क, बूट) न पुरवणे, हे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.
दुसरीकडे, ठेकेदार पवार आणि मुकादम खलील शहा यांनी आपली बाजू मांडताना व्यवस्थेतील त्रुटींकडे बोट दाखवले. “कमी दराने ठेका भरलेला असतानाही चार वर्षांपासून त्याच दराने काम ओढले जात आहे,” असे सांगत त्यांनी बिले अडकल्याचे कारण पुढे केले. मात्र, कामगारांनी ‘रोखीने पीएफ मागितला’ हा त्यांचा दावा कायद्याच्या चौकटीत किती टिकणारा आहे, हा प्रश्नच आहे.
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दोन्ही बाजूंना ‘दोन पावले मागे सरकण्याचे’ आवाहन करत सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न केला आहे. “शहराला वेठीस धरू नका, अन्यथा कायद्यानुसार कारवाई करू,” असा कडक इशारा त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर दोन्ही गट चर्चेला तयार झाले असले, तरी मूळ प्रश्न ‘कामगारांच्या हक्काचा’ आहे.
शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना जर स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी आणि पीएफसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ते लोकशाहीला भूषणावह नाही. प्रशासनाने केवळ ‘मध्यस्थ’ न राहता, कामगारांना किमान वेतन आणि सुरक्षितता मिळेल याची खात्री करणे गरजेचे आहे. पेन्सिलीने वेतन लिहिणे आणि पीएफमध्ये गोंधळ करणे ही बाब कामगार आयुक्तांच्या चौकशीचा विषय ठरू शकते.
या महत्त्वपूर्ण बैठकीस आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव यांच्यासह संबंधित ठेकेदार आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. आता या चर्चेतून कामगारांना खरोखर न्याय मिळतो की केवळ आश्वासनांची बोळवण होते, याकडे संपूर्ण कामगार तसेच शहराचे लक्ष लागले आहे.
खान्देश समाचार…
