अमळनेर प्रतिनिधी:
अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, प्र. डांगरी येथील १९९९-२००० या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच २६ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षांनंतर या बॅचचे वर्ग मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र आले आणि त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
४२ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांनी या ‘गेट-टूगेदर’ला उपस्थिती लावली. इतक्या मोठ्या कालखंडानंतर सर्व विद्यार्थी एकत्र येतील का, अशी शंका सुरुवातीला होती; पण मोठ्या उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. माजी मुख्याध्यापक बी.एस. चौतमल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपस्थित आजी-माजी शिक्षकांचा यथोचित शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा वर्गात जाऊन शिक्षकांकडून अध्यापनाचा अनुभव घेतला. एकमेकांची विचारपूस करीत आणि विविध प्रकारचे खेळ खेळत सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. अनेकांनी मनसोक्त नाचून आनंद द्विगुणीत केला.
१९९९-२००० बॅचची आठवण म्हणून वर्गमित्रांनी शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा भेट दिली. त्यानंतर सामूहिक फोटोसेशन पार पडले.
हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सुनील कोळी व इतर मित्रांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश शिसोदे यांनी केले, तर आभार राकेश पवार यांनी मानले.
