अमळनेर:
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटकाळात एक आदर्श निर्णय घेतला आहे. यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करता, तो खर्च आपत्तीग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दरवर्षी सभापती अशोक पाटील यांचा वाढदिवस बाजार समितीचे कर्मचारी, विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी, आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि अशोक भाऊ मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात.
मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. अमळनेर तालुक्यात अनेक ठिकाणी कापूस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः, सभापतींच्या पत्नी आणि आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. योगिता अशोक पाटील या ज्या मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करू इच्छितात, त्या गटातील वासरे, खेडी, आणि खर्दे या गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, सभापती अशोक पाटील यांनी आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसावर होणारा खर्च त्यांनी वरील अतिवृष्टीग्रस्त गावांमधील गरजू शेतकऱ्यांना मदत स्वरूपात देण्याचे ठरवले आहे.
हितचिंतकांना मदतीचे आवाहन…
इतकेच नव्हे, तर सभापती अशोक पाटील यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवार, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “माझ्या वाढदिवसानिमित्त जे कुणी मला भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ देऊ इच्छितात, त्यांनी कृपया त्याऐवजी ती रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत म्हणून द्यावी. असे झाल्यास, माझा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने एका शेतकरी पुत्राला शोभणारा वाढदिवस साजरा झाल्याचे समाधान मला लाभेल.”
सभापती अशोक पाटील यांच्या या निर्णयाचे आणि आवाहनाचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
खान्देश समाचार….
