अमळनेर:(प्रतिनिधी)शहरातील रामेश्वर नगर भागात श्री रायरेश्वर महादेव मंदिराच्या उभारणीचा भूमिपूजन सोहळा नुकताच आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या मंदिराच्या उभारणीमुळे परिसरात नवचैतन्य, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश प्रसारित होईल, असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या धार्मिक सोहळ्याची महापूजा माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील आणि स्वप्नाताई विक्रांत पाटील यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडली. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर आणि उत्साही होती.
या सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, दादा पवार, रणजीत शिंदे, विनोद कदम, बाळू पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, महिला-पुरुष आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील तरुण मंडळींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शेटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुकेश पाटील यांनी मानले. रामेश्वर नगरमध्ये या मंदिराच्या उभारणीमुळे परिसरातील धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक नवा अध्याय जोडला गेला आहे.
