अमळनेर: (प्रतिनिधी) अमळनेर शहरासाठी तसेच येथील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. अमळनेर येथील रहिवासी आणि चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत असणारे प्रा. डॉ. राहुल निकम यांचे चिरंजीव चि. सिद्धांत राहुल निकम यांची NFSC (National Fellowship For Schedule Caste) या प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय एवं अधिकारीता मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार सिद्धांत निकम यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. अत्यंत कठोर निकषांमधून ही निवड करण्यात येत असल्याने सिद्धांतचे हे यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे.
असामान्य शैक्षणिक कर्तृत्व:
सिद्धांत निकम यांचे आजवरचे शैक्षणिक यश थक्क करणारे आहे.
त्यांनी M. Pharmacy ही पदवी तब्बल ८३.६९% गुणांसह उत्तीर्ण केली आहे. त्यांनी ३ वेळा G. PAT (Graduate Pharmacy Aptitute Test) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केली आहे.विशेष म्हणजे, त्यांनी ३ वेळा NET (National Eligibility Test) परीक्षा उत्तीर्ण केली असून, एकदा GATE (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षा देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
या सर्व राष्ट्रीय परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशामुळेच त्यांना NFSC शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळाला आहे.
सध्या Ph.D. साठी कार्यरत:
सध्या चि. सिद्धांत हे लखनौ (उत्तर प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विश्वविद्यालय येथे Ph.D. (डॉक्टरेट) पदवीसाठी संशोधन करत आहेत. या शिष्यवृत्तीमुळे त्यांच्या उच्च शिक्षणाचा आणि संशोधनाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे.
प्रेरणादायी प्रवास:
अमळनेरसारख्या लहान शहरातून येऊन सिद्धांतने राष्ट्रीय स्तरावर एवढे मोठे यश संपादन केले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छाशक्ती या बळावर त्यांनी हे सिद्ध केले आहे की, इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर कोणतीही शैक्षणिक उंची गाठता येते. त्यांचे हे यश महाराष्ट्रातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील हजारो होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरले आहे.
चि. सिद्धांत राहुल निकम यांचे या उत्तुंग यशाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील संशोधनात्मक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! त्यांच्याकडून देश आणि राज्याला मोठे योगदान मिळेल, अशी आशा आहे.
खान्देश समाचार..
