अमळनेरवरून घरी परतताना काळाने हिरावले, मेहनती ज्ञानेश्वरच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ
अमळनेर (प्रतिनिधी) :टाकरखेडा गावावर काल (सायंकाळी) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिवाळीच्या तोंडावर अवघ्या अंदाजित ३० वर्षांच्या मेहनती तरुणाचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील ( रा. टाकरखेडा) असे अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही हृदयद्रावक घटना काल सायंकाळी सात ते सव्वा सात वाजेच्या दरम्यान टाकरखेडा येथील पेट्रोल पंपाच्या अगदी समोर घडली. ज्ञानेश्वर पाटील हा अमळनेर येथून आपल्या टाकरखेडा गावी परत येत असताना त्यांच्या मोटरसायकालीचा अत्यंत जबरदस्त अपघात झाला.
या भीषण धडकेत ज्ञानेश्वर यांच्या छाती तसेच छाती खालील भागास गंभीर मार लागला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यांना तातडीने उपचाराची गरज होती. स्थानिक ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, छातीला झालेल्या जबर मारामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने अवघे टाकरखेडा हादरून गेले आहे.
कुटुंबावर दु:खाचा आघात
ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. ऐन दिवाळीच्या सणामध्ये त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अत्यंत मेहनती आणि उमद्या स्वभावाचा तरुण असे त्याचे गावात नाव होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून, गावकरी आणि मित्र परिवाराला अश्रू अनावर झाले आहेत. होत्याचे नव्हते झाले आणि दिवाळीचा आनंद क्षणात मावळला आहे.
खान्देश समाचार…
